माझ्या पुस्तकांची मुखपृष्ठं,
शीर्षकं आणि शीर्षकांसंदर्भातल्या
ओळी हे सर्व कालक्रमानुसार
बारकाईनं पाहिलं तर माझ्या बदलत
गेलेल्या अभिव्यक्तीचा पोत लक्षात
येईल. त्रयस्थपणानं पाहताना माझ्या
या एकूण निर्मिती-प्रवासातली
स्थित्यंतरं मलाही जाणवली. या
निमित्तानं पुस्तकांची मनोगतं
वाचली तेव्हा लक्षात आलं की या
बदलाच्या प्रक्रियेविषयीच्या काही
नोंदी त्यात आहेत. म्हणून ती
मनोगतं इथे देते आहे.
आरसा या पहिल्या मराठी
कवितासंग्रहाला आणि दोन्ही हिन्दी
कवितासंग्रहांना मान्यवरांच्या
प्रस्तावना आहेत. त्यांनी त्यात
माझ्या कवितेचा परिचय करून दिला
आहे. त्या प्रस्तावना आणि माझ्या
बदलत गेलेल्या अभिव्यक्तीचं खरं
दर्शन घडवणाऱ्या काही प्रातिनिधिक
कविता रसिकांसमोर ठेवते आहे.