पुस्तके : मराठी गद्य लेखन    
   
 

 

       
 
 

...आणि भाषा कळणं म्हणजे
अनुभूतीत
स्वतःचा सारांश प्रतीत होणं
असण्याचं उद्‍घाटन करणारी
कविता लिहिता येणं..!

   

कवितेभोवतीचं अवकाश

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : सचिन लेले
आवृत्ती पहिली : ३० जानेवारी २०१२
किंमत : १८० रुपये, पृष्ठे १९६

           
   
 
   
   
केवळ असण्याचा
जगण्यात अनुवाद करायचा
तर कळायला हवी भाषा
असण्याची, जगण्याची
जशी चित्रकाराला
कळावी लागते
रंगांची, आकारांची भाषा
आणि भाषा कळणं म्हणजे
अनुभूतीत
स्वतःचा सारांश प्रतीत होणं
असण्याचं उद्‍घाटन करणारी
कविता लिहिता येणं..!
 
डॉ. विलास खोले यांच्या प्रस्तावनेमधून

या लेखसंग्रहात एकंदर एकवीस लेख असून त्यांतील पहिले पाच लेख निखळ
कविताविषयक आहेत. ते स्वतःच्या कवितांच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत.
पुढले नऊ लेख मुख्यत्वेकरून कवितेतील पाऊस, कवितांचे वैपुल्य, कवितांतील
गणेशदर्शन, जनाबाईंच्या अभंगातील ‘दर्शन’, कवितेतून दिसणार्‍या इंदिरा
संत, रॉय किणीकरांचा ‘उत्तररात्र’ हा कवितासंग्रह अशा विषयांसंबंधीचे
आहेत. अनुवाद, चांगल्या कवितेचे निकष, कलेतील विद्रोह, कविता आणि ईश्वर
इत्यादी विषयांसंबंधीही आसावरी काकडे यांनी लिहिले आहे. वरवर पाहता या
लेखांत विषयांचे वैविध्य दिसत असले तरी बहुतेक लेखांच्या केंद्रस्थानी
कविताच आहे. त्यामुळे ‘कवितेभोवतीचं अवकाश’ हे लेखसंग्रहाचे शीर्षक सार्थ
ठरते. आसावरी काकडे यांच्या कविताविषयक चिंतनाचा परिपाक म्हणून हा
लेखसंग्रह महत्त्वाचा ठरतो. सर्वच लेखांमधून कवितेविषयीचा विचार मांडताना
काव्यनिर्मिती करणारी व्यक्ती कवितेच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेत आहे.

‘कवितेभोवतीचं अवकाश’ या लेखसंग्रहाचे महत्त्व अशासाठी की, कवितेसंबंधी
यापूर्वी बरेच काही लिहून झाले असले तरी ते बाजूला ठेवून कवितेसंबंधीचे
स्वानुभवाधिष्ठित विचार या संग्रहातून आसावरी काकडे यांनी मांडले आहेत.
त्या विचारांतून त्यांच्या काव्यविषयक तत्त्वचिंतनाचा आणि आकलनाचा
प्रत्यय आपल्याला येत राहतो इतकेच नव्हे तर, त्यांच्या हातून कवितेच्या
स्वरूपाविषयी असेच आणखीही भरघोस लेखन घडत राहील, असा विश्वास उत्पन्न
होतो.

   
                   
 


Designed By HSMS