पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

आगीतून आल्या      अग्निदिव्या जशा
ओलांडून अशा        किती कन्या

त्यांची कथानके      त्यांच्याच कविता
जगण्याची गाथा     सांगतात !

   

स्त्री असण्याचा अर्थ

प्रकाशक : सेतू प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : स्वाती कापुसकर, पुणे
आवृत्ती पहिली : १९ डिसेंबर २००६
किंमत : १०० रुपये, पृष्ठे ८८

           
   
 
   
   
स्त्री असण्याचा अर्थ
 
स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व ?
कळायला हवा
पुरुषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ
निभवायला हवं प्रत्येकानंच
आपापल्या परीनं स्त्रीत्व
स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा
टिकून राहाणं तुफानी वादळातही
स्त्री असणं म्हणजे
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश
रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना...प्रेम....तितिक्षा !
.......
पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण !!
 
मनोगत

तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी स्त्री मासिकाच्या संपादकीय संवादातून विद्या बाळ यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याशी होत राहिलेल्या संवादातून माझ्या विचारांना सामाजिक वास्तवाचे भान आले. `स्त्री' आणि `मिळून साऱ्याजणी' या त्यांच्या मासिकातून स्त्री-प्रश्नांशी ओळख झाली. हळूहळू त्यातली सूक्ष्मता आणि व्याप्ती लक्षात यायला लागली. स्त्री-मुक्ती चळवळीची गरज, तिचं स्वरूप, तिचा इतिहास आणि भूगोलही माहिती व्हायला लागला. भोवतीचं वास्तव अनुभवताना स्त्रीची होत असलेली घुसमट प्रकर्षानं जाणवू लागली. सुरुवातीच्या काही कवितांतून ही घुसमट व्यक्त झाली आहे. पण नंतर साहित्य आणि तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासामुळे विचारांचा परीघ बदलला. अनुभव घेण्याचा दृष्टिकोन बदलला तशी कविताही बदलत गेली.

एका बाजूला अभ्यास, चिंतन-मनन चालू असतांना दुसऱ्या बाजूला जगण्याचे वास्तव प्रत्यक्ष, सहअनुभूतीने अनुभवत होते. विचार आणि जगणं यांची सांगड घालताना दमछाक होत होती. अवती-भवती वावरणाऱ्या समस्या अंतर्मुख करत होत्या तर त्यांच्यासह ताठ उभ्या राहाणाऱ्या अनेकींच्या कहाण्या लक्ष वेधून घेत होत्या. यांचं काही तरी करायला हवंय अशी सुप्त जाणीव सतत मनात होती. पण सुरुवात होत नव्हती. या वैचारिक प्रवासात `बोलो माधवी' हा डॉ. चंद्रप्रकाश देवल यांचा हिंदी कवितासंग्रह हातात पडला. महाभारतातल्या माधवीच्या निमित्तानं आजच्या स्त्री-वास्तवाचंही चित्रण करणाऱ्या या कवितांनी मला अस्वस्थ केलं. स्त्री समस्यांचा दंश नव्यानं जाणवावा इतक्या प्रभावी असलेल्या या कवितांमुळे मी अंतर्मुख झाले. एक स्त्री असून माधवीच्या कथेनं मी इतकी, अशी का दुखावले नाही? असं वाटत राहिलं. त्या भारावलेपणातच या संग्रहाचा मी अनुवाद केला. `बोल माधवी' या नावानं तो दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झाला आहे.

ही अनुवाद प्रक्रिया मला दोन पातळयांवर प्रेरणा देत राहिली. एक- संवेदनशील कवयित्री या नात्यानं स्त्री-वास्तवासंदर्भातली माझी भूमिका, माझी अस्वस्थता मी शब्दबद्ध करावी आणि दुसरी प्रेरणा- एक सूत्र घेऊन सलग कविता-निर्मिती करता येईल, ती करावी. बरेच दिवस मनात असलेल्या लिहिण्याच्या उर्मीला बाहेर पडण्याचा मार्ग समजला.

स्त्री-प्रश्नासंदर्भात वेगवेगळया प्रकारे, वेगवेगळया पातळयांवर लेखन करता येणं शक्य आहे. तशी गरजही आहे. पण हे करतांना स्त्री असणं म्हणजे काय ? हे समजून घेतलं पाहिजे. स्त्रीचं स्त्री म्हणून महत्त्व नेमकं कशात आहे? स्त्री असण्यामुळे तिला कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि तरीही ती कशी सगळयाला तोंड देत उमेदीनं जगते ते समजून घेतलं पाहिजे. सर्व क्षेत्रात आज स्त्री नाव कमावते आहे. मोठमोठी उदाहरणं देऊन स्त्री पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून दिलं जातं. पण मला सतत जाणवत आलंय की स्त्रीचं मोठेपण केवळ यात नाही. ते एक व्यक्ती म्हणून तिच्या अंगच्या गुणांनी तिनं मिळवलेलं मोठेपण आहे. स्त्रीचं स्त्री म्हणून असलेलं खरं सामर्थ्य ती ज्या धैर्यानं विपरीत स्थितीतही उभी राहाते, उद्ध्वस्त न होता आपला परिसर सांभाळते त्यात आहे. चिवटपणे तग धरून, धैर्यानं कृतिशील राहात, सर्जक आनंदाचा शोध घेत जगता येणं हे स्त्रीचं खरं सामर्थ्य आहे. अगदी सामान्यातली सामान्य स्त्रीही प्रसंगी असं धैर्य दाखवते याची असंख्य उदाहरणं देता येतील.

या संग्रहात मी अशा काही स्त्रियांची आयुष्यं शब्दबद्ध केली आहेत. ती प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. स्त्री-स्वरूपाचं हे अर्थातच परिपूर्ण चित्र नाही. आणखीही कितीतरी खडतर आयुष्यं रंगवता येतील. पण मी आपल्या अनुभव घेण्याच्या मर्यादेत मावले तेवढेच मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पहिली कविता ही भूमिकाच स्पष्ट करणारी आहे.

या लेखन प्रक्रियेत मला स्त्री असण्याचा अर्थ नेमकेपणानं उलगडत गेला. स्त्री-पुरुष समानता या संकल्पनेतलं मर्म लक्षात आलं. स्त्री-पुरुष समानता म्हणजे दोघांना माणूस म्हणून चांगलं आयुष्य जगण्याची समान संधी मिळणं, दोघांना समान दर्जा मिळणं एवढंच नाही. यामधली सूक्ष्मता लक्षात घ्यायला हवी. स्त्री असणं म्हणजे ऋजुता, प्रेम, त्याग.... इ. गुण असणं आणि पुरुष असणं म्हणजे साहस, बुद्धिमत्ता, महत्त्वाकांक्षा... इ. गुण असणं असं मानलं जातं. पण हे फारच ढोबळ, वरवरचं आणि दिशाभूल करणारं आहे. हा मुद्दा अतिशय वेगळया तऱ्हेनं समजून घेण्यासारखा आहे. पुरुषी आणि बायकी म्हणवले जाणारे हे दोन्ही प्रकारचे गुण एकूण समाज-स्वास्थ्याच्या दृष्टीनं आवश्यक आहेत. म्हणूनच स्त्री-पुरुष समानता या संकल्पनेत या दोन्ही प्रकारच्या गुणांचा समतोल अपेक्षित आहे. पण पुरुषप्रधान समाजरचनेत पुरुषाला प्रतिष्ठा आणि स्त्रीला दुय्यमत्व मिळत राहिल्यामुळे `बायकी' गुणही दुय्यम, कमी महत्त्वाचे ठरायला लागले. एकूण परिस्थितीचा रेटा म्हणून स्त्रिया बऱ्याच प्रमाणात पुरुषांची भूमिका घ्यायला लागल्या. पण त्या प्रमाणात पुरुष स्त्रियांची भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे दोन्ही गुणांतला समतोल ढळतो आहे. परिणामत: कुटुंबजीवनात अशांती आणि समाजात अराजकता माजत चालली आहे. हा समतोल टिकवायचा असेल तर स्त्री-गुणांचा, स्त्री असण्याचा आदर करणारी मानसिकता वाढायला हवी.

The Tao of Physics -by Fritjof Capra या पुस्तकात या संदर्भात नेमकेपणानं लिहिलेलं नुकतंच वाचनात आलं. त्याचा भावार्थ असा - ``विश्वाच्या द्वंद्वात्मक स्वरूपातलं एक महत्त्वाचं द्वंद्व म्हणजे माणसातलं पुरुषत्व आणि स्त्रीत्व. सुख-दु:ख, जीवन-मृत्यू यासारखी द्वंद्वं आपण समजू शकतो. पण आपल्यातलंच स्त्री-पुरुष द्वंद्व समजून घेताना आपण गोंधळतो. मग आपण त्यातल्या एकालाच प्राधान्य देतो. परंपरेनं समाजात पुरुषत्वाला प्राधान्य मिळत गेलं. प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक पुरुषाचं व्यक्तिमत्व हे स्त्री आणि पुरुष तत्त्वाचं एक विशिष्ट मिश्रण आहे हे समजून घेण्याऐवजी अशी प्रथा प्रस्थापित होत राहिली की सगळया पुरुषांनी मर्दानी असावं आणि सर्व स्त्रियांनी बायकी. त्यामुळे पुरुषांच्या हाती समाजाचं नेतृत्व आलं. त्यांना सर्व अधिकार मिळाले. परिणामत: पुरुषप्रधान समाजात माणसातल्या पुरुषीपणावर-बुद्धिमत्ता, स्पर्धा, आक्रमकता.. अवाजवी भर दिला गेला. आणि त्याच्यातलं स्त्रीत्व -उत्स्फूर्तता, धार्मिकता, संवेदनशीलता... सतत दडपलं गेलं !... या स्त्रीत्वाचा विकास होऊन माणसातल्या दोन्ही प्रवृत्तींमध्ये ऐक्य निर्माण व्हायला हवं. चिनी तत्त्ववेत्ता लाओ त्सू यानं म्हटलं आहे - A fully realised human being is one who knows the masculine and yet keeps to the feminine - स्व-रुपाची पूर्ण समज आलेली व्यक्ती पुरुषत्व जाणते आणि तरी स्त्रीत्वही जतन करते.''

एक चांगलं, प्रगल्भ माणूस होण्यासाठी या पातळीवर स्त्री असण्याचा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. ही गरज लक्षात येईल तेव्हाच अपेक्षित परिवर्तन घडून येईल. या संग्रहातल्या कविता म्हणजे यासाठी केलेला एक अल्प पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

   
                   
 


Designed By HSMS