|
|
आवृत्ती पहिली |
 |
|
आवृत्ती दुसरी |
 |
|
|
|
|
|
|
|
माधवी
मृत्यू, दु:ख, पराभव कुणाचाही असो
सर्व पराभूतांसाठी
मी विचलित होईन.
तुझ्यासारख्या प्रत्येक
आयुष्यासाठी
मला पाझर फुटेल...
केव्हाही कुठेही
जन्मेल, वाढेल, आज्ञाधारक बनून
परहितासाठी, परक्या आगीत
जळत असेल एखादी स्त्री...
एखादी माधवी...
त्या प्रत्येक वेळी मी व्यथित
होईन ! |
|
|
बोल माधवी
(डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या `बोलो
माधवी' या कवितासंग्रहाचा अनुवाद)
पहिली आवृत्ती : १७ जानेवारी २००४
प्रकाशक : सेतु प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : शाम भुतकर, पुणे
किंमत : १२० रुपये, पृष्ठे १६०
दुसरी आवृत्ती : एप्रिल २००७
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : पद्मा सहस्रबुद्धे,
पुणे
किंमत १२५ रुपये, पृष्ठे १६० |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अनिषिद्ध जिज्ञासा
मोनालिसाचं
गूढ स्मित पांघरलेला मुखवटा
उतरव माधवी चेहऱ्यावरून..
केव्हा पासून मी विचारतो आहे
प्रश्नावर प्रश्न
उत्तर दे त्यांचं..
अनुत्तरित प्रश्नांच्या
अफवा होतात माधवी...
सामोरं गेलं नाही त्यांना
तर ते स्वार होतात आपल्यावर...
आणि.. विचारणाराही
वेताळ नाही कुणी...
तुकडे तुकडे होणार नाहीत
तुझ्या मस्तकाचे...
विश्वास ठेव..
समजू शकणारेच गप्प बसतात
मूग गिळून
उघड मिटलेले ओठ
पडू देत बाहेर
आतून जिभेवर आलेली उत्तरं
हे छिन्नमस्ता...
सांगितल्यावर हलकं होतं मन
मुक्त होतो माणूस...
अनेक आयुष्यांच्या गर्दीतून
बाहेर काढून
नि:संदेह आपलंच असलेलं आयुष्य
मुक्त माणूसच जगू शकतो...
अश्वस्त होऊन सांग...
सांग असं की चक्रावून जातील लोक
स्वत:चं खरं रूप कळेल त्यांना...
........................
सांग...सांग...माधवी
तुझ्या तोंडून ऐकायचंय मला
की स्त्री असत नाही एखादा प्रदेश
जिथे सागरी तुफानात
होरपळलेले सारे जीव
यावेत आसऱ्यासाठी...
विसरून आपापली वृत्ती
जीव घेऊन घुसावेत गुहेत
बरोबरच शिकार आणि शिकारीही...
का असतो शब्दांचा हा अशुभ मेळ ?
सतीत्व आणि स्त्रीत्व...
का वाटतात हे शब्द एकसारखे ?
गुपचुप कोण भरतं अर्थ त्यात ?
आणि तुझं मौन का होतं अर्थाचं मुखद्वार
जिथे थांबून जातात
सगळीकडून आलेले अर्थ...
जेव्हा तू काठोकाठ भरून जातेस
या अर्थानी
तेव्हा शिल्लक कुठे उरते जागा
तुझ्या आत
जिथून उठेल प्रश्न
की स्त्री आणि पुरुषांसाठी
भिन्न भिन्न का असतात पावित्र्याचे अर्थ ?
|
|

|
|
|
|
`बोलो माधवी' हा डॉ. चंद्रप्रकाश देवल
यांचा हिंदी कवितासंग्रह दोन वर्षांपूर्वी
वाचनात आला. वाचून अस्वस्थ झाले. भारावून
गेले. अंतर्मुख झाले. अस्वस्थता त्यातल्या
विषयामुळे आली आणि ज्या संवेदनशीलतेनं,
प्रगल्भतेनं कवीनं हा विषय हाताळला आहे ते
जाणवून भारावून गेले. बरेच दिवस विषय आणि
कविता मनात घोळत राहिल्या. वाटलं यांचा
अनुवाद करावा.
कवितांचा अनुवाद करायला मला आवडतं. कारण
त्यात दुहेरी आव्हान असतं. एक-कुणीतरी
रचलेला शब्दांचा व्यूह भेदत आत शिरायचं...घायाळ
न होता...घायाळ न करता सहीसलामत बाहेर
पडायचं...तेही नुसतं नाही...शब्दांच्या
आत-बाहेर, आजूबाजूला, वर-खाली पसरलेला आशय
लपेटून! आणि दुसरं आव्हान - हा लपेटलेला
आशय उतरवून, पसरवून द्यायचा `आपल्या'
शब्दांच्या आत-बाहेर, आजूबाजूला, वर-खाली
आणि रचायचा आपला व्यूह! हे आव्हान पेलताना
कस लागतो भाषिक संवेदनांपर्यंत पोचण्याच्या
आपल्या क्षमतांचा. या कसोटीला उतरण्यातला
आनंद पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखा असतो.
मात्र मूळ कवितेत असं आव्हान देण्याचं
सामर्थ्य असावं लागतं.
`बोलो माधवी' हा कवितासंग्रह वाचल्यावर
त्यातल्या कवितांचा अनुवाद करण्याचा मोह
मला झाला. या कवितांचा अनुवाद करण्याचं
दुसरं कारण म्हणजे या कवितांचं वेगळेपण!
या सर्व कविता महाभारतातल्या एका कथेवर
आधारित आहेत. पण हे कथा-काव्य नाही. एखादी
दीर्घ कविता असावी असा त्यांचा पोत आहे.
महाभारतातील मूळ कथा वाचताना, वाचल्यावर
विचार करताना मनात उठलेला भावनिक कल्लोळ
म्हणजे या कविता आहेत! यांचं आणखी एक
वैशिष्ट्य म्हणजे त्या फक्त माधवी या
पौराणिक पात्राबद्दल बोलत नाहीत. तर
माधवीच्या निमित्तानं, पुराणकाळापासून
चालत आलेल्या परंपरेत, पुरुष प्रधान
संस्कृतीत स्त्रीचं स्थान काय आहे, तिच्या
दु:खाचं स्वरूप काय आहे याची सूक्ष्म तरी
प्रखर अशी समीक्षाच या कवितांतून भावनिक
पातळीवर केली गेली आहे. उदा. `संयोग नहीं,
स्त्री है वह' या कवितेत म्हटलंय -
`अयोध्या से लेकर हस्तिनापूर तक
सोनागाछी से भिंडी बाजार तक
जहाँ जहाँ आदम की बस्ती हो
मानचित्र में नि:संकोच अपनी अँगुली रखना
ठीक अँगुली के पोर के नीचे से
खदखदाती प्रकट होगी स्त्री!
दहेज के एवजाने में अधजली
अथवा जलने को सन्नध
संखिया खाने से पहले
घर भर के बर्तन, कपड़े, झाडू-पोचे
और नाश्ते का काम
हड़बड़ी में निबटाती
तुम्हें जो भी स्त्री दिख जाए
समझना माधवी है!...
`स्त्री होने का अर्थ' ( स्त्री असणयाचा
अर्थ) ही संपूर्ण कविताच स्त्री असणं
समजून घेणारी एक अप्रतिम कविता आहे. ती
सलग पूर्णच वाचायला हवी.
कवितेतून हे सर्व एका पुरुषानं अधोरेखित
करावं याला एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे
या मांडणीला एक अर्थपूर्ण परिमाण लाभलं आहे.
अनेक अर्थांनी महत्त्वाचा असलेला हा
कवितासंग्रह मराठी वाचकांपर्यंत पोचवावा
असं मनापासून वाटलं.
परिशिष्टामध्ये मूळ संस्कृतमधली ही कथा
मराठी अर्थासह दिलेली आहे. डॉ. देवल
यांच्या मनोगतातही हा कथाभाग आलेला आहे.
या कविता लिहिण्यामागची आपली भूमिका
त्यांनी इथे स्पष्ट केलेली आहे.
प्रत्यक्ष अनुवाद करताना, कविता समजून
घेताना डॉ. देवल यांची मदत घ्यावी लागली.
एक वाचक म्हणून कवितेचा आपल्या तऱ्हेनं
आस्वाद घ्यायला आपण मोकळे असतो. पण अनुवाद
करताना तसं स्वातंत्र्य असत नाही. कविता
समजली, भावली तरी मूळ कवीला नक्की काय
अभिप्रेत आहे हे समजून घेणं महत्त्वाचं
असतं. नाहीतर अनुवाद म्हणजे रूपांतर होऊन
जाईल. म्हणून जिथे जिथे थोडीसुद्धा शंका
आली तिथे तिथे प्रत्येक वेळा पत्रातून तिचं
निरसन करून घेतलं. या सर्व पत्रांतून डॉ.
देवल यांची भूमिका अधिक स्पष्ट होत गेली.
आत्मसात केलेला हा आशय मराठी कवितांच्या
रूपात मांडताना माझी खरी कसोटी होती.
कवितेची लय, भाषिक सौंदर्य सांभाळता
सांभाळता मूळ कवितांचा स्वत: कवीला
अभिप्रेत असलेला आशय मूळ कवितेसारखाच
सूचकतेनं मांडायला हवा होता. पण हे सर्व
इतक्या स्वाभाविकपणे, सहज जमत गेलं की जसं
काही मलाच सुचून मी हे लिहीते आहे. अर्थात
अशा काही जागा आल्याच की जिथे माझं पूर्ण
समाधान झालं नाही.
अनुवाद करताना बरेचदा भावनिक प्रतिक्रिया
उमटत राहिल्या. शब्द, विषय, आशय यांच्या
आतल्या सूक्ष्म गल्ली-बोळातून फिरताना
सारखं वाटत राहिलं हे सर्व मी, एका
स्त्रीनं म्हणायला हवं होतं. स्त्री-पुरुष
संबंधाचा उघड व्यवहार हा या साऱ्या
कवितांच्या पार्श्वभूमीवर आहे. त्याच
संदर्भातलं माधवीचं दु:ख कविमन जाणून घेऊ
पाहातं आहे. या प्रयत्नात जेव्हा ते
माधवीबरोबर अंत:पुरातल्या राजशय्येपर्यंत
पोचलं तेव्हा वाचता वाचता अंगावर शहारे आले...
`पीड़ा का मखौल' या कवितेत म्हटलंय -
`सच बताना, माधवी
क्या काशी के रनिवास में
तू जिस तरह सकुचाई थी
ठीक वैसे ही
अयोध्या की राजशय्या पर भी लजाई थी?'
हे वाचल्यावर मनातल्या मनात एक निषेधाची
छटा उमटून गेली. पण याच कवितेत पुढे
म्हटलंय-
`सवाल पूछ कर नहीं उछालना मुझे अपना चेहरा
यह सभी कुछ तो अभद्र है
निहायत अश्लील
यह पीड़ा का जानना-समझना नहीं
यह तो पीड़ा का मजाक है...'
हे वाचल्यावर ती निषेधाची रेषा पुसली गेली.
आणि `अपनी अपनी यातना' ही कविता वाचल्यावर
तर मनात अधून मधून उमटणाऱ्या सगळया शंकांचं
निरसन झालं. या कवितेत म्हटलंय, `माधवी,
तुला समजून घेण्याचा एकही मार्ग दिसत नाही.
आता-
`न जान पाने की यातना
तेरी पीड़ा से बड़ी होने लगी है
...और माधवी हो कर जानना
एक दूसरी जात की दिल्लगी है!'
कविमनाची उत्कट संवेदनशीलता आणि खानदानी
सभ्यता या ओळींतून व्यक्त झालीय. आश्चर्य
वाटावं इतक्या प्रखर स्त्रीवादी भूमिकेतून
लिहिलेल्या या कवितांमध्ये एक कविता आहे `अनकहा
हिसाब'. या कवितेनं या भूमिकेला हृद्य शह
देऊन तिला एक निखळ मानवी परिमाण दिलं आहे.
या कवितेत म्हटलंय -
`काम की चतुरंगिनी सजाकर
चार चार सेनापतियों ने
किया है जो चरम अनाचार
एक निहत्थी नार पर
उनके गुनाह तले दबा
मर्दों का वंशज, मैं मर्द
आज उरिन होना चाहता हूँ पितृऋण से!
प्रायश्चित्त के कितने चातुर्मास चाहिए?
बोलो माधवी..'
वाचकांना मूळ कवितेचा पोत कळावा म्हणून
सर्व उदाहरणं जाणीवपूर्वक मूळ हिंदी रूपात
दिली आहेत.
`बोलो माधवी'चा अनुवाद करताना स्त्री
दु:खाची सूक्ष्मता आणि सार्वत्रिकता जाळत
राहिली. वाटलं, माधवी किती वेगळया अर्थानं
अमर झालीय! माधवीच्या निमित्तानं आजच्याही
स्त्रीची वेदना या कवितांतून प्रभावीपणे
सर्वांसमोर येते आहे. अंत:करणात खोलवर
शिरून अस्वस्थ करणाऱ्या या कविता
अनुवादाच्या माध्यमातून मराठी
वाचकांपर्यंत पोचवताना एखादी जबाबदारी पार
पाडावी तसं काहीसं समाधान वाटतं आहे. |
|
|