पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

आता
ते भरले गेलेले गाडगे
माझ्या शेतात
रिकामे करुन
रहाटाला
पुन्हा गती दिलीय मी !

   

रहाटाला पुन्हा गती दिलीय मी

प्रकाशक : सेतू प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : शाम भुतकर, पुणे
प्रथमावृत्ती : २३ जानेवारी २००५
किंमत : १०० रुपये, पृष्ठे १२८

           
   
 
   
   
त्यांना माहीत नाही

वर उडवलेल्या सागरगोट्याचा
झेल न चुकवता
कुणालाही धक्का न लावता
खालचा एक एक सागरगोटा उचलायचा
एकखयी दुख्खयी करत
मजेत डाव संपवायचा...
या खेळानं शिकवलेलं कसब
वापरलं तिनं नातेसंबंध हाताळताना
न सांगतां
रेषेच्या आत राहून

तिने निर्माण केले आपले विश्व
सजवले...जोपासले
जिवापाड जपले !
वेळप्रसंगी सोसले तिने
कित्येक लहान-मोठे
अकरा सप्टेंबर
भोगले
कधी गोध्रा कधी जळगाव
सहन केले
पानशेत....कोयनेचे घाव
रेषेच्या आत राहून !

त्यांनी ओळखले तिचे सामर्थ्य
खोलवर रुजलेले
त्या अभिमंत्रित रेषेच्या आत
कोंडलेले
नव्या युगाचे आव्हान म्हणून मग
त्यांनी उचलून नेली
तिच्या दारातली रेषा
आणि म्हटले-

बाहेर पड आता
रेषेखालचे खंदक बुजवले आहेत
झालंच तर
आरक्षित केले आहेत
तुझ्यासाठी काही वॉर्डस्
आता अडखळू नकोस आत
स्वयंपाक झाला की बाहेर पड लगेच
वाटल्यास परत जा घरी सातच्या आत !

घाबरू नकोस
कदाचित् जमणार नाही तुला
काळी चारमधलं गाणं
पण पार्श्वगायक आहेत ना
तुला फक्त ओठच तर हलवायचेत !

त्यांना माहीत नाही
कदाचित्
तिलाही कळलेलं नाही अजून
की तिला सापडेल
स्वत:चा गंध असलेला अंत:स्वर
तेव्हा लागणार नाही तिला
कुणी पार्श्वगायक
कसले आरक्षण
कुणाचे निमंत्रण!
 
मनोगत

`अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं...' असं म्हणत जन्म साजरा करणारं बडबडगीत, `मधु मागशी सख्या परी...' सारखं एका आंतरिक अवस्थेला शब्द देणारं भावकाव्य, जात्यावर म्हटली जाणारी ओवी, कीर्तनात आळवला जाणारा एखादा अभंग, `मी'चा परीघ विस्तारत गेल्यावर विश्व हेच घर वाटण्याच्या उत्कट मानसिकतेला स्फुरलेली `जो जें वांछील तो तें लाहो...' सारखी प्रार्थना आणि अंतिम सत्याचा स्पर्श झालेल्या क्षणाची निर्मिती असलेला `ओम पूर्णमद: पूर्णमिदम्...' सारखा शांतिमंत्र.... ही सर्व कवितेची रूपं ! जगण्याच्या या टोकापासून शब्द पोहोचू शकतो तिथपर्यंतच्या अवकाशात झुलत असते कविता. कधी इथे... कधी तिथे !

कोणत्याही रूपातली प्रत्येक प्रामाणिक कविता अभिव्यक्ती असते एकेका आकलनाची. ते आकलन असेल स्वत:विषयीचं, नात्यांविषयीचं, समाजस्थितीचं, निसर्गाचं.... किंवा या सगळयाच्या मुळाशी असू शकेल अशा एखाद्या तत्त्वाचं !

आपल्या असण्याविषयीची समजूत अशा कितीतरी परींनी वाढत राहाते. आयुष्य उलगडत राहातं, एखाद्या ग्रंथाचा आशय उलगडावा दर वाचनात तसं. रोजच्या दैनंदिन जगण्यात तसं फार नवीन काही घडत नाही. घटना-प्रसंगांची आवर्तनंच चालू असतात, पण वाढलेल्या समजुतीमुळे दृष्टी बदलते त्यांच्याकडे बघण्याची. ती घेऊन जाते आकलनाच्या नव्या टप्प्यांवर. कधी होते घसरण पण तीही वाटते पानगळीसारखी... नव्या बहराला जागा करून देणारी !

मग प्रत्येक उंचीवरून नव्या तऱ्हेनं कळावं आकाश, नव्या उत्कटतेनं जाणवावं त्याचं दूरपण तसे नव्या उमाळयानं भेडसावत राहातात जगण्याविषयीचे तेच ते प्रश्न ! व्याकूळ करता करता समजूत वाढवतात. नव्या रूपात येऊन जगण्याला अर्थ देतात. ही एक अखंड प्रक्रिया आहे सजग, संवेदनशील मनात चालणारी. सर्जक क्षणी कवितेला जन्म देणारी.

कविता उदघाटन करत असते अशा क्षणांचे. शब्दांत बांधून ठेवते त्यांना.... `मी एक दर्शनबिंदू' या माझ्या चौथ्या कवितासंग्रहानंतरच्या ५-६ वर्षांच्या काळात असे काही क्षण वाट्याला आले. प्रत्येक क्षणाचे दान वेगळे होते. कुठून कुठे हेलकावे घेणाऱ्या मनाचे उदगार या क्षणांच्या साक्षीने व्यक्त होत राहिले. नवा चेहरा, नवी व्याकुळता घेऊन आलेले जुने अनुत्तरित प्रश्न, स्पष्ट होत गेलेले संभ्रम, कळेनासं होण्याची आवर्तनं, शहाणी होत गेलेली समजूत... यांना शब्द मिळाले. त्या कवितांचा हा नवा संग्रह !

जगण्याचे रहाटगाडगे फिरत राहाते. एकेक गाडगे भरत जाते. एकेक रिकामे होत जाते. पुन्हा भरते एकेका नव्या आकलनाने... आता ते भरले गेलेले गाडगे माझ्या शेतात रिकामे करून राहाटाला पुन्हा गती दिलीय मी !

   
                   
 


Designed By HSMS