पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

संपूर्ण पूर्वार्ध रुजू होतो आत
येतो उजेडात उत्तरार्ध
उत्तरार्ध पुन्हा दिसून शब्दांत
होतो विसर्जित पूर्वार्धात
व्यक्त-अव्यक्ताचा चालतसे खेळ
कवितेत मेळ दोन्हीचाही !

   

उत्तरार्ध

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे, पुणे
आवृत्ती पहिली : सप्टेंबर २००८
किंमत : ८० रुपये, पृष्ठे १२०

           
   
 
   
   
एकेकाने फळी ओढली की !

घट फुटे तेव्हा तुटे देहपाश
आकाशी आकाश मिळतसे

लाडका दृष्टांत हीच जर साक्ष
मृत्यू हाच मोक्ष का न होई ?

बंधनात कोण मृत्यू आल्यावर
काय बांधणार नाहीच जे ?

सूक्ष्म देह-बिह संकल्पना काही
एकमत नाही त्यांच्याविशी

`बंध-मोक्ष' सुद्धा एकमार्गी नाही
देही की विदेही किती मार्ग !

नेमक्या दिशेने नेमक्या पक्षात
मृत्युच्या दारात जावयाचे

मग म्हणे मोक्ष मिळतो योग्याला
इथेच शंकेला जागा आहे !

सारेच सापेक्ष अल्बर्ट म्हणतो
काळ दिशा जो तो सर्व घेई

सर्व दिशा आणि सगळयाच वेळा
पवित्र भक्ताला तुका म्हणे

अद्वैताच्या चवी चाखलेला भक्त
होईना विभक्त कोणेवेळी

ज्ञाना म्हणे त्याला मोक्ष सारखाच
दिशा, पक्ष जाच नाही नाही

मार्क्स म्हणे मुक्ती हीत शोषितांचे
मुक्त समाजाचे त्याचे स्वप्न

नवेच सांगती आधीचे खोडून
कुणाला सोडून कुठे जावे ?

संकल्पनाधार होते पायातळी
एकेकाने फळी ओढली की !

झाले अधांतरी झाले हतबुद्ध
असा बुद्धिभेद बरा काय?
 
मनोगत

जगण्यातल्या कोणत्याच प्रश्नाला तत्त्वज्ञानाकडून तयार उत्तर मिळत नाही. उलट ते त्या प्रश्नाच्या दुतर्फा नवे प्रश्नच उभे करतं. कवितेची वाट या दुतर्फा प्रश्नांच्या मधून जाते. तीही पोचत नाही कोणत्याच उत्तराच्या मुक्कामाशी. पण ती जाता जाता दोन्ही बाजूंच्या प्रश्नांची ओळख करून देते. हे प्रश्न विस्कटून टाकतात आतली व्यवस्था, उघडं करतात दैन्य. रूढ समजुतींच्या पायाखालची आधारफळी ओढून घेतात. होत्याचं नव्हतं करतात....

कविता शब्दांकन करते अशा उखडलेल्या अवस्थांचं आणि आपल्याला आपल्यासमोर उभं करते ! स्वत:वरचं कवच फोडून अनावरपणे असं भाषेत व्यक्त होणं ही एक सर्जक घटना आहे. त्यातून एकाचवेळी भाषिक कृतीच्या आधारे स्वत:च्या भाषेची निर्मिती होते आणि आपल्या एका स्वरूपाचंही उदघाटन होतं. अशा दरवेळी आपलं अनावरण करून कविता नव्यानं ओळख करून देत राहते आपली आपल्याला. स्व-आकलनाचं साधन झालेली कविता जसजशी खऱ्या `मी'बद्दल बोलत जाते तसतशी ती सार्वत्रिक आणि समकालीन होत जाते. अधिकाधिक सहज होत जाते !

कविता लिहिता लिहिता कवितेच्या या सामर्थ्याची प्रचिती येते तेव्हा हेही लक्षात येतं, की वेळोवळी धारण केलेले मुखवटे उतरवून घेण्यासाठी कवितेला सामोरं जाणं सोपं नाही ! त्यासाठीचं बळ जगण्यातल्या सजग अनुभवातून मिळतं, भोवतीच्या घटना-प्रसंगांच्या हार्दिक निरीक्षणांतून मिळतं; तसंच नवनव्या पद्धतीनं मूलभूत प्रश्न उपस्थित करणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातूनही मिळतं....

`उत्तरार्ध'मधल्या कवितानिर्मितीच्या काळात मला याची झलक अनुभवायला मिळाली !

गेल्या काही वर्षांपासून माझ्या परीनं तत्त्वज्ञान विषयाचं वाचन, अभ्यास होतो आहे. त्यातल्या ज्या संकल्पनांनी मला खोलवर प्रभावित केलं, ज्या कविता-प्रक्रियेत सामील झाल्या त्याविषयी इथं थोडंसं सांगितलं पाहिजे... आपण सतत ऐकत, समजत आलेलो असतो की हे सर्व एक आहे. भेदाभेद हा भ्रम आहे. आपलं वेगळेपण या एकूणात विसर्जित करता यायला हवं... इ.

फ्रेंच तत्त्वज्ञ जे.पी.सार्त्र यांचे माणसाच्या स्वरूपासंदर्भातले विचार समजून घेताना बरोबर याच्या उलट काहीतरी सांगितलं जातं आहे असं वाटलं. सार्त्र यांच्या मते वस्तू-विश्वाहून माणूस वेगळा आहे. कारण माणसाला जाणीव असते आणि ती आहे याचीही जाणीव असते. या जाणिवेचं स्वरूपच असं की माणसाला निवडीचं, स्वत:ला घडवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. नव्हे, त्याच्यासाठी स्वातंत्र्य ही अटळ गोष्ट आहे. पण हे स्वातंत्र्य माणसाला पेलवत नाही. तो भयभीत होतो. त्यातून सुटायला बघतो.... आपल्या अमुक एका अवस्थेला परिस्थिती कारण आहे असं म्हणणं त्याला सोपं आणि सोयीचं वाटतं... सार्त्र यांनी अशा पलायनाला, माणूस म्हणून असलेलं वेगळेपणं नाकारण्याला `बॅड फेथ' म्हटलं आहे. `स्वत:ला वेगळं मानणं, अहं जोपासणं म्हणजे अश्रद्धा' अशा संस्कारांनी घडलेल्या मनाला हा धक्का होता... आपले संस्कार, आपलं तत्त्वज्ञान खरंच काय सांगतं? सार्त्र काय दाखवून देताहेत? दोन्हीत खरंच विरोध आहे की वेगवेगळया भाषेत एकच काही सांगितलं जातंय? या प्रश्नांनी या विषयाच्या अधिक खोलात शिरण्याची प्रेरणा दिली.

डॅनिश तत्त्वज्ञ सरेन किर्केगार्ड यांनीही `Individual' ही संकल्पना सार्त्रच्या अगोदर अधोरेखित केली होती. त्यांच्या मते ईश्वरसाक्षीनं, स्वत:शी अत्यंतिक जवळचं नातं असलेली `व्यक्ती' असणं, व्यक्ती म्हणून असलेली आपली जबाबदारी निभावणं आवश्यक आहे. समूहाचा, एकूण असण्याचा भाग होणं, गर्दीत लपून राहणं म्हणजे ही जबाबदारी टाळण्यासारखं आहे. किर्केगार्डला ही संकल्पना इतकी महत्वाची वाटली की त्यानं आदर्श अशा `That Solitary Individal' लाच आपलं एक पुस्तक `Purity Of Heart Is To Will One Thing' अर्पण केलंय.

अस्तित्ववादाच्या अभ्यासाच्या जोडीनं ईशावास्य उपनिषद संस्कृतमधून समजून घेताना शब्दांच्या सूक्ष्म आणि व्यापक अशा मूळ आशयाचा उलगडा होत राहिला. उदा. `अस्', `भू', `वृत' या मूळ धातूंप्रमाणे `ईश्' हा धातूही अस्तित्ववाची असून त्याचा अर्थ सत्ता गाजवणारं अस्तित्व, किंवा जे आहे म्हणून हे सर्व विश्व आहे असं अस्तित्व असा आहे... अशा स्पष्टीकरणातून अस्तित्वाविषयीच्या आकलनाचं नवंच दर्शन घडत गेलं.

नव्या भाषेत, नव्या तऱ्हेनं समोर येणाऱ्या अशा आकलनामुळे मनात रुजलेल्या जुन्या समजुतींना तडे जात राहिले. त्यातून आलेल्या अस्वस्थतेतून प्रतिक्रिया उमटत राहिल्या. प्रश्न पडत राहिले... या एकूण अभ्यासानं माझ्या भावविश्वात, जाणिवेच्या पातळीवर घडवलेली उलथापालथ सांडत राहिली कधी जगण्यात, कधी डायरीत, कधी कवितेत...

सन २००४ पासून अधूनमधून होत राहिलेल्या अशा कविता या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. वाचनामुळे फक्त आशयाच्या पातळीवरच काही घडत असतं असं नाही. संत तुकारामांची गाथा वाचताना त्यातल्या आशयाबरोबर अभंगांची लय तिच्या सामर्थ्यासह मनात रुजत राहिली. विनोबांची `गीताई' ही त्यातल्या तत्त्वज्ञानाबरोबर आपली लय समजावत राहिली. कधी कधी शब्दांसोबत मनात रुजलेली अशी एखादी लयही आशय बनून व्यक्त होते कवितांमधून. `उत्तरार्ध'मधल्या काही कवितांना अभंग छंदाची लय सापडलीय. `सांग गीता पुन्हा नवी' या कवितेला `गीताई' रचनेची लय आहे.

माझ्या एकूण काव्यप्रवासातला `उत्तरार्ध' कवितासंग्रह हा एक महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं.

   
                   
 


Designed By HSMS