पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

मी तुला
माझा,
अगदी माझाच असलेला
आरसा दिला
तरी त्यात तुला
तुझंच रूप दिसेल !

   

आरसा

प्रकाशक : सेतू प्रकाशन
मुखपृष्ठ : प्रतापराव मुळीक, पुणे
प्रथमावृत्ती : २७ एप्रिल १९९०,
किंमत : २५ रुपये, पृष्ठे ६८

द्वितीयावृत्ती : २४ एप्रिल १९९३
किंमत : ३० रुपये

           
   
 
   
   
प्रिय सखी,


प्रिय सखी,
सध्या मी आटपाट नगरातील
एका भव्य पिंजऱ्यात राहाते आहे.
याच्या भिंतींना पाचूचा रंग आहे
आणि याला चांदीचे छत आहे !
याची दारं पारदर्शी आहेत.
आणि गंमत म्हणजे
ती बाहेरून नाही,
आतून बंद आहेत !
उडी मारून कडी काढता येईल
एवढीच ती उंच आहेत.
पण इथल्या संगमरवरी फरशीला
गुरुत्वाकर्षण फार आहे !
उंच उडीचा सराव असूनही
उडी जमेनाशी झालीय.
नि आतल्या भव्यपणातच
मला वाटतं, मी आता रमू लागलीय !
`चिउताई, चिउताई, दार उघड'
असं म्हणत तू आलीस तर
`थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते'
असंच काहीसं माझ्या तोंडून येईल.
पण सखी,
रागावून तू लगेच निघून जाऊ नकोस.
मला साद घालीत रहा.
मी केलेला उंच उडीचा सराव
बहुधा मला इथे रमू देणार नाही !
 
प्रस्तावना - शिवाजी सावंत

`आरशा'त डोकावण्यापूर्वी !

सौ. आसावरी काकडे यांचा हा पहिलाच काव्यसंच - आरसा. यात ५५ कविता समाविष्ट झाल्या आहेत. या संग्रहाच्या `आरसा' या शीर्षकाच्या मागील अर्थपूर्णता स्पष्ट करण्यासाठी कवयित्रीनं मोजक्याच चार ओळी दिल्या आहेत. त्या जरी बारकाव्यानं वाचल्या तरी सौ. काकडे यांच्या कवितेचा अचूक चिंतनशील बाज ध्यानी येईल. मोजक्या शब्दांत आपले चिंतन नेमके पकडण्याची त्यांची काव्यशैली रसिक जाणत्यांना स्पर्शून जाईल.

या काव्यमय आरशात मला काय जाणवलं? इथं कवयित्री स्वत:चा शोध घेताना तिचं म्हणून जे एक संस्कारसंपन्न तत्त्वज्ञानाचं संचित आहे ते गाठीशी घेऊन काव्यनिर्मितीला आवश्यक तो अलिप्तपणा साधतानाही लयबद्धता, अचूक शब्दरचना यांचे मनोज्ञ भान ठेवते आहे. ही किमया अवघड आहे.

या कवितांतील निसर्गवर्णनपर ज्या मोजक्या कविता आहेत त्यांत नेमकं शब्दचित्र उभं करण्याचं लक्षणीय सामर्थ्य आहे. त्यातील सर्वाधिक लक्ष वेधणारी आहे ती `वीज' ही कविता. तिच्यातील `गात्रांतील हलवुन प्राण' ही संकल्पना प्रत्ययकारी अनुभव देणारी नाही काय ?

गंधवार्ता, पाणी, मृदगंध ह्या निसर्गानुभूतीशी निगडित रचना अशाच लयदार वाटल्या. सौ. काकडे यांनी अशा कवितांची निर्मिती मर्यादित न ठेवता अवश्य वधारून घ्यावी असे आवर्जून सांगावेसे वाटते.

एकूण `कविता' ह्या आत्मप्रकटी साहित्यप्रकाराबद्दल इथे एक सशक्त भान मला आढळले. `कविता' नावाच्या पहिल्याच रचनेत वेदनेशिवाय खरे `काव्य' हुंकारत नाही हे शाश्वत सत्य कवयित्रीने फारच थोडक्या ओळींत अचूक पकडले आहे. ह्या काव्यसंचाचा प्रारंभ `कविता' या सार्थ रचनेने होतो व शेवट `माझी कविता' ह्या तेवढ्याच चटका लावणाऱ्या अर्थपूर्ण रचनेने होतो आहे.

सौ. काकडे यांच्या ह्या कविता अधिकतर चिंतनपर असून अनेक ठिकाणी मानवी जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या आहेत. यासाठी त्या कधी `तू'शी तर कधी `सखी'शी बोलताना आढळतात. या संवादांचे खास वैशिष्ट्य आहे ते हे की, ते आपल्या समोरच चालले आहेत इतके सहजरूप होतात. या जीवनभाष्यात विषयांची विविधता आहे. ते कधी `शब्द' या सर्व साहित्याचे मूल रूप असलेल्या सत्यावर होते, तर कधी `वेदना' ह्या काव्याच्या मूलतत्त्वावर होते. ही भाष्ये करताना रचनाकर्त्री कधी कधी मनाच्या इतक्या खोलवटात शब्दसूर घेते की आपण अवाक् होतो. पर्याय, शोध, अंतर, पहारा, त्रिशंकू, गूढ, अधांतर या कवितांत याचा प्रत्यय प्रकर्षाने येतो.

`नको खोदूस मनाला' कारण त्याचा तळ लागणं शक्य नाही असं बजावणारी कवयित्री गूढतेकडं वळते व `परीस-स्पर्श' झाल्यावरही चक्क सोनं व्हायचं विसरून जाणारी मी वेंधळी नाही का असंही स्वत:ला म्हणून मोकळी होते !

आधुनिक स्त्री जीवनाच्या रामरगाड्यात कशी `हरवली' आहे याचा वेध इथं `मी हरवले आहे' या रचनेत बघायला मिळतो.

मानवी जीवनाचं एक `गणित' आहे असं म्हणताना गणितातल्या बेरीज, वजाबाकी, गुणिले, भागिले ह्या संकल्पना इथं भेटतात व गणिताची `रीत' कळली तरी अद्याप `उत्तर' मात्र सापडलेलं नाही असं रचनाकर्त्री सांगून जाते.

मंदिर, दृष्टी ह्या कवितांत सामाजिक ढोंगावर मर्मवेधी परखड प्रहार आढळतो.
'प्रतिष्ठा' (?), 'खंत' अशा खोलार्थी रचना सिद्ध करताना कवयित्री म्हणून मनाची जी `अस्वस्थता' पार पाडावी लागली असेल तिचाच वेध `धग' या रचनेत विलोभनीय सुंदरपणे घेतला आहे.

`लळा' या कवितेतील `निरंजन सावल्या', `गणित' मधील `वाहत्या पाण्यावर रांगोळी काढायला जाणं', `सोंग' कवितेतील `चालू दे मला माझ्या नभाखाली', `अधांतर'मधील `विवस्त्र विचार' व `माझी कविता' मधील `शब्दात प्रकटणारी कविता - नुसत्या डोळयांनी वाचणाऱ्यांना कशी कळेल सांग ना?' अशी कितीतरी अभिजात काव्यसौंदर्यस्थळे इथे काव्यानंद देऊन जातात.

सौ. आसावरी काकडे यांच्या कविता फुटकळपणे नियतकालिके व वृत्तपत्रे यांत वाचणाऱ्या वाचकांना `आरसा' ही एक स्वागतार्ह काव्यभेट या संचाने मिळते आहे. `आरसा' ही मराठी काव्यात लक्षणीय भर आहे.

या निमित्ताने सौ. आसावरी काकडे यांच्या चिंतनशील प्रतिभेला पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक सुयश चिंतितो.

   
                   
 


Designed By HSMS