पुस्तके : मराठी गद्य लेखन    
   
 

 

       
 
 

संक्षिप्त 'आनंदी गोपाळ'
(श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या कादंबरीचे
कुमारवयीन मुलांसाठी संक्षिप्तीकरण)

   

आनंदी गोपाळ
प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ.
मुखपृष्ठ : राहुल देशपांडे
आवृत्ती पहिली : डिसेंबर २०१८
किंमत : १२५ रुपये, पृष्ठे १४४

           
   
 
   
   
आनंदी जोशी - पहिली स्त्री-डॉक्टर

"आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे...
आज मला विशेष आनंद होत आहे.
या कॉलेजच्या इतिहासात हा दिवस
सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवायला हवा.
आजपर्यंत हिंदुस्थानातली एकही स्त्री
येथे येऊन शिकून डॉक्टर झाली नव्हती...
मिसेस आनंदी जोशी यांनी
हिंदुस्थानची पहिली स्त्री-डॉक्टर
होण्याचा मान मिळवला आहे !..."
अध्यक्ष बोलत होते
आणि टाळ्यांच्या कडकडाटाने
सभागृह दुमदुमून जात होते...!
 
मनोगत

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संक्षिप्तीकरण प्रकल्पासाठी श्री. ज. जोशी लिखित 'आनंदी गोपाळ' ही प्रेरणादायी कादंबरी मुलांसाठी संक्षिप्त रूपात तयार करताना एक वेगळं समाधान वाटत राहिलं. ही मूळ कादंबरी ३४० पानी आहे. 'आनंदी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाली' ही या कादंबरीची कथा...! एवढसं सांगायला एवढी पानं? एकविसाव्या शतकाच्या अतिप्रगत कालखंडातल्या मुलांना नक्कीच असा प्रश्न पडेल...

पण ही कादंबरी वाचताना लक्षात येईल की ही कथा जेवढी आनंदी आणि गोपाळराव जोशी यांच्या आज अविश्वसनीय वाटू शकेल अशा संघर्षमय आयुष्याची कथा आहे तेवढीच ती त्या काळाची, त्या काळातल्या आयुष्य जखडून ठेवणार्‍या रूढींची, रूढींना कवटाळून बसलेल्या समाजाचीही कथा आहे.

१८७४ साल आहे.. नऊ वर्षांच्या आनंदीच्या लग्नाची खटपट सुरू आहे, पंचवीस वर्षांच्या गोपाळरावांशी तिचं घाईघाईत लग्न उरकलं गेलंय.. इथून या कादंबरीची सुरुवात होते आणि डॉक्टर होऊन अमेरिकेहून परतल्यावर क्षयासारख्या आजारानं वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी- १८८७ साली तिचा मृत्यु झाला, इथे ती संपते. या तेरा वर्षात ही कथा कल्याण, ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, मुंबई, भूज, कलकत्ता... अमेरिकेतील रोसेल गाव, फिलाडेल्फिया, बोस्टन... आणि परत मुंबई... पुणे या गावांमधून... तिथे भेटणार्‍या माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तींमधून उलगडत जाते...

स्थल-कालाच्या या पटावर 'आनंदी गोपाळ' हा पूर्ण चित्रपट डोळ्यापुढे साकारावा इतकी या कादंबरीची भाषा प्रत्ययकारी, उत्कट आणि त्या कालखंडाला साजेशी आहे. वाचताना यातल्या व्यक्तीरेखा जिवंत होऊन मनाचा ठाव घेतात... ऐतिहासिक तपशिल ललित कादंबरीच्या रूपात आणताना चालू शकतील असे थोडेफार कलात्मक बदल लेखकाने केलेले आहेत. ही कादंबरी संक्षिप्त रूपात आणताना स्वाभाविकपणे यातील बराच मजकूर गाळावा लागला तेव्हा, एखादं जमून गेलेलं पोर्ट्रेट समोर ठेवून आपण त्याचं रेखाचित्र बनवतोय असं वाटत राहिलं..! तरी या संक्षिप्त रूपातही कादंबरीचे मूळ स्वरूप, भाषाशैली, त्यातली उत्कटता... सर्व आहे तसं राखत पूर्ण कथानक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून मूळ कादंबरी, आनंदीबाई, गोपाळराव जोशी यांचं चरित्र आणि त्या काळचा इतिहास वाचण्याची प्रेरणा मुलांना नक्कीच मिळेल.

आसावरी काकडे

   
                   
 


Designed By HSMS