पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

कुणी म्हणाले
तुझ्या कवितेत
नेहमी आकाशच असते !
मी म्हणाले
आकाश नसते कुठे ?

   

आकाश

प्रकाशक : सेतू प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : चंद्रकांत मांडरे, कोल्हापूर
आवृत्ती पहिली : १५ ऑगस्ट १९९१
किंमत : ३० रुपये, पृष्ठे ७२

           
   
 
   
   
जाणीव

आपण रोज पहातो
तेवढा एकच सूर्य नाही
आपण गाणी रचतो
तो चंद्रही एकमेव नाही
आपल्याला माहिती आहेत
अशा अनेक ग्रहमाला आहेत
नि अनेक आकाशगंगा सुद्धा !
हे मला समजलं तेव्हा मी म्हटलं,
असतील - असू देत !
पण माथ्यावरचं
हे अथांग निळं आकाश
ते सुद्धा एकच एक नाही
हे कळलं तेव्हा मात्र
मी कासावीस झाले
कारण
आता माझ्या नगण्यतेला
काही सीमाच उरली नाही !
 
मनोगत

`आरसा' नंतरचा `आकाश' हा माझा दुसरा कवितासंग्रह. कवितेबरोबरच्या प्रवासात या वळणापर्यंत अनेक सुहृदांची उमेद वाढवणारी सोबत मला मिळाली. वडीलधाऱ्यांचे कौतुक आणि आशीर्वाद लाभले, आणि मान्यवरांचे प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन झाले. या सर्वांच्या मन:पूर्वक जिव्हाळयाने मला थांबू दिले नाही. मला चालण्याचे श्रेय मिळाले ! आता चालत राहण्यावरची माझी श्रद्धा वाढली आहे. मनाला उभारी आहे आणि पावलांना दिलासा ! या पुढील प्रवासातही ही न संपणारी शिदोरी माझ्या सोबत असेल या विश्वासाबरोबरच या साऱ्यांविषयीचा कृतज्ञ भाव मनात जागतो आहे. हे सारं जिवापाड जपत तुमच्या साक्षीनं मी चालत राहीन.

   
                   
 


Designed By HSMS