पुस्तके : मराठी गद्य लेखन    
   
 

 

       
 
 

माझी आई श्रीमती मंदरा सुब्बा
आणि जीवनसाथी पूर्ण
यांना

   

अथांग
प्रकाशक : साहित्य अकादेमी
मुखपृष्ठ : अनील दाभाडे
आवृत्ती पहिली : २०१८
किंमत : १२५ रुपये, पृष्ठे १३०

           
   
 
   
   
मोहन ठकुरी यांच्या प्रस्तावनेतून

या कादंबरीच्या पार्श्वभूमीवर
एक मनोरुग्णालय आहे
आणि तिथलेच मनोरुग्ण यातली पात्रं आहेत
पण ही कथा या रोगाची किंवा रोग्यांची नाहीए.
विस्कटून विकृत झालेल्या,
वास्तव जगाशी संपर्क तुटलेल्या
असहाय मनांच्या आक्रोशांची कथा आहे ही.
त्यात जाणीव गमावलेल्या
अनियंत्रित मनांचा प्रवाहही सामावलेला आहे.
हे सर्व समजून घ्यायला
विशेष संवेदनशील मन हवं..!
 
मनोगत

ज्येष्ठ नेपाळी साहित्यकार बिंद्या सुब्बा यांच्या 'अथाह' या कादंबरीचा मराठी अनुवाद मी 'अथांग' या नावाने केला आहे. या कादंबरीची निवेदिका एक नर्स आहे. नर्सिंग कोर्स करण्यासाठी ती आपलं प्रिय गाव दार्जिलिंग सोडून शहरात आलीय. तिची ड्यूटी मनोरुग्णालयात लागलेली आहे. तिथल्या मनोरुग्णांशी अत्यंत ममतेनं वागणारी ही नर्स प्रत्येक मनोरुग्णाच्या भावविश्वाशी कमालीची समरस झालीय. आणि ती आपले सर्व अनुभव अत्यंत उत्कटतेनं सांगते आहे. प्रत्येक रुग्णाला त्याच्या पार्श्वभूमीसह समजून घेण्यातली तिची हार्दिक जिज्ञासा, त्यासाठी काही वेळा अभ्यासक्रमाच्या मर्यादा ओलांडणं, ते समजून अंतर्बाह्य अस्वस्थ होणं, त्यांच्या भवितव्याचा विचार करत राहाणं हे सर्व ती हातचं काही न राखता आपल्याशी शेअर करते आहे. या कथनात इतकं ताजेपण आहे की जणूकाही ती आत्ता अनुभवतेय आणि लगेच सांगतेय.. त्यामुळं कादंबरीच्या कथनात सर्वत्र वर्तमानकाळ आलेला आहे. अनुवादासाठी हे सर्व पुन्हा पुन्हा वाचताना मीही आतून हलत राहिले. ही अस्वस्थता केवळ भवानिक स्तरावर राहिली नाही. ती अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडत राहिली.

या नर्सचा रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ, संवेदनशील आणि व्यवहाराचं भान असलेला असा आहे. प्रीती, संध्या, अपराजिता, राजीव, रजत आणि गोपाल अशा अनेक रुग्णांच्या कथा ती आपल्याला सांगते. या निवेदनातून त्यांच्या आयुष्यातल्या घटना आणि त्यांच्या भावविश्वाबरोबरच तिची स्वतःची अस्वस्थ घालमेलही आपल्या पर्यंत पोचत राहाते. या रुग्णांच्या आयुष्यांशी ती इतकी समरस झालीय की वाटत राहातं- त्यांची नाही, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या स्वतःच्या आयुष्याचीच कथा ती आपल्याला सांगतेय.. आपला कोर्स संपवून परतणारी घायाळ अवस्थेतली ही नर्स कादंबरी संपल्यावरही आपल्याला अस्वस्थ करत राहाते. तीच या कांदबरीची नायिका आहे..!

या कादंबरीतील अभिव्यक्तिचं एखादं उदाहरण पाहिलं तरी त्यातल्या उत्कटतेचा अंदाज येऊ शकेल. कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नर्ससोबत अधून मधून सतत आपल्याला प्रीती भेटत राहते. सुरुवातीपासूनच तिनं या नर्सचं लक्ष वेधून घेतलंय. ती तिच्या हृदयातली जखम बनून गेलीय. वीस बावीस वर्षांच्या या लाघवी रुग्ण मुलीला अत्यंत गलित गात्र अवस्थेत पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जातं. कोर्स संपवून सर्वांना भेटून परतताना तिला हे दृश्य दिसतं. त्या वेळच्या तिच्या मनःस्थितीचं कादंबरीच्या शेवटी आलेलं वर्णन-

"मी अजून तिथंच उभी आहे. त्याच जागी, जिथून मी पाहातेय माझ्या मागे असलेल्या लोखंडी ग्रील्सच्या खोल्या... दुर्दैवी प्रीतीला आत्ताच तिथं कैद केलं गेलंय.... आणि औषधांच्या अंमलाखाली असलेले बाकीचे रूग्णही झोपलेत तिथे. आणि माझ्यासमोर उभा आहे तो मुख्य दरवाजा दूरवर पसरलेल्या मोकळ्या भूमीकडे नेणारा... त्याच्या पल्याड असलेल्या डोंगररांगांकडे.... तिथंच आहे माझं छोटंसं जग. झरे आणि नद्या वाहतायत... त्याना ओलांडण्याच्या माझ्या धैर्याला आवाहन करत. आणि लढण्यासाठी कितीतरी लढे आहेत तिथेही.

उभ्याउभ्याच कितीतरी क्षण निघून गेलेत... पण आज मला निघायला हवं. वाटलं तरी मला आता मागं वळता येणार नाही. मी माझं हृदय शोधते... तिथं दिसतं मला उंच 'बुरॉस'वृक्ष उभे असलेलं अंगण आणि त्यामागचं माझं घर अजून धडधडत असलेलं..! पाणावल्या डोळ्यांनी, अडखळत मी त्या दरवाज्यातून आणि मग दुसर्‍या मुख्य दारातून बाहेर पडले आहे...!"

बिंद्याजींशी फोनवर बोलताना एकदा 'वह नर्स मैं ही हूँ..' असं त्यांनी म्हटल्याचं आठवतंय. या कादंबरीला साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी मला पत्रानं कळवलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं- "मार्च के मध्य में दिल्ली जाना है अकादेमी पुरस्कार ग्रहण करने के लिए. मैंने अपनी संवेदनशीलता ही क्या पूरी जान ही उड़ेल दी थी इस 'अथाह' में. अभी पुस्तक के कारण मेरे यह सौभाग्य है, पर सखी इन दिनो सोचती ही हूँ कि कैसी होगी उस अभागिन युवती प्रीति? किस हाल में है वह?..."

सत्य आणि कादंबरीचं विश्व यांचं हे नातं अविस्मरणीय आहे..!

आसावरी काकडे

   
                   
 


Designed By HSMS