पुस्तके : मराठी    
   
 

 

       
 
 

केलिया फावला ठायींचा तो लाहो
तृष्णेचा तो काहो काव्हवितो !

संत तुकाराम

   

लाहो

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : स्वाती कापुसकर, पुणे
आवृत्ती पहिली : २ मे १९९५
किंमत : पन्नास रुपये, पृष्ठे ९६

           
   
 
   
   
कवितेला तर नाहीच,
कवितेखालीही नसावे कुणाचे नाव !

नसावे तिला कुठल्याच संदर्भाचे आवरण.
नुसते रुळावे तिने ओठांवर आपल्या सहज लयीत
जात्यावर म्हटल्या जाणाऱ्या अनाम ओवीसारखे !
असावे तिने अलिप्त, निरामय
एखाद्या शांत सरोवरासारखे.
जितकी भेदक नजर, जाणवावेत
तितके खोलातले आशयाचे तरंग.
थेट स्पर्शावे तिने मनातल्या संदिग्ध आशयाला.
थरथरावे काही खोलवरचे.
अक्षरातून उठून घर करावे मिटलेल्या काळजात
नि उमलवावीत भावफुले सगुण रुपात !

शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला
लागू नये एकाच अर्थाचे गाव.
कवितेला तर नाहीच,
कवितेखालीही नसावे कुणाचे नाव !
 
मनोगत

ऋतुचक्राप्रमाणे आनंद-उल्हास, व्यथा-वेदना, भीती-अस्वस्थता देणारे क्षण आलटून पालटून आयुष्यात येत असतात. जगणं अर्थपूर्ण करत असतात. आनंदाचे, तृप्तीचे क्षण मनाची उमेद वाढवतात, तर वेदना अंतर्मुख करते. कधी कधी तृषार्त मनाला कशाची तहान आहे हेही उमगेनासे होते तेव्हा अस्वस्थता येते. या अनाकलनीय अवस्थेत शब्द संवाद होऊ शकला तर शांत होता येते. मनाने अनुभवलेल्या आर्त, उत्कट क्षणांच्या तळाशी जाऊन पुन्हा काठावर तटस्थपणे स्थिरावता आले तर शब्दात व्यक्त होता येते. गेल्या तीन-चार वर्षांतील अशा काही क्षणांना साक्षी असलेल्या कवितांचा हा संग्रह `लाहो'.

लाहो म्हणजे ध्यास. संत तुकारामांच्या गाथेतला हा शब्द. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या संदर्भात मला तो भावला आणि कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून मनात रुजला. `अधीरता', `आक्रोश', `खंत', `अतृप्ती' अशा याच्या आणखी काही अर्थछटा समजल्या तेव्हा हे शीर्षक अधिकच अर्थपूर्ण वाटले. कारण अशा भाव-कल्लोळातच कवितेचा उगम असतो.

`आरसा', `आकाश' नंतरचा `लाहो' हा माझा तिसरा कवितासंग्रह. यातील कवितांची मांडणी काहीशी हेतुपूर्वक केलेली आहे. एक सलग अनुभव देणाऱ्या कविता अनुक्रमात सलगपणे घेतल्या आहेत.

   
                   
 


Designed By HSMS